नामांतराचा हातभार विकासाला लागेल ??
नामांतर नव्हे ,अहिल्यादेवींना अभिप्रेत विकासाची गरज ओळखा !
तीनशे वर्षानंतरही अहिल्यादेवींचा कारभार आदर्शवतच
सिटीझन न्यूज -यासीन शेख-9423391215
सध्या शहरांच्या, गावांच्या संस्थांच्या नावात बदल करण्याचे काम गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभर चालू आहे .अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यात आले. या नामांतरानंतर अहिल्यानगरच्या विकासाच्या कोणत्या बाबतीत वाढ झाली हे सर्वांना माहित आहे .
आता अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याचे नावही अहिल्यादेवी होळकर यांच्याच नावाने व्हावे अशी मागणी “जनजागरण युवा मंच” च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे .तसेच जामखेड नगरपरिषदचे देखील अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी उपोषण करण्यात आले आहे .काय चाललय हे जनता बिचारी मुकी बहरी असल्यागत शांत आहे .मग कुणीही कशीही हाका !?
शहराचे गावाचे कींवा एखाद्या संस्थेचे नामांतर झाले तर तेथील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी नामांतराचा हातभार लागेल का ? असे होण्याची सूतराम शक्यता वाटत नाही .
शहरांचे नामकरण करण्याची मागणी करताना तेथील पायाभूत सुविधांचा विकास, रोजगाराच्या संधी आणि नागरिकांचे राहणीमान सुधारणे ही आज काळाची गरज आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.
नामांतर’ ही अस्मिता, सामाजिक न्याय आणि इतिहासाची पाळेमुळे घट्ट करणारी प्रक्रिया असली, तरी शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी ‘विकास’ हाच खरा कणा आहे. शहराचे नाव बदलल्याने मूळ समस्या सुटत नाहीत, त्याकरिता थेट कृती आणि नियोजनाची गरज आहे हे लक्षात घेऊन सार्वजनिक विकासाचे मुद्दे घेऊन शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी कोणी पुढे येण्याची गरज आहे .मात्र तसे होतांना दिसत नाही .
केवळ नावाच्या बदलाने शहरात थेट रोजगार निर्मिती होणार आहे का ? शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ,भौगोलिक, औद्योगिक ,राजकीय ,नागरिकांचे आरोग्य ,राहणीमान यापैकी कोणत्या बाबींचे विकासाचे ,गुणवत्तेचे प्रमाण बदलणार आहे .
शहराचा विस्तार होताना पिण्याचे पाणी, अखंड वीज पुरवठा, दर्जेदार रस्ते, आणि सांडपाणी व्यवस्थापन .
कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवणे, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि ई-प्रशासनाचा वापर करून नागरिकांची कामे वेळेत होणे, ही विकासाची मुख्य गुरुकिल्ली फीरविण्याचे कोणाच्या डोक्यात का येत नाही.??
सर्वसमावेशक विकास ,सामाजिक सलोखा, सामाजिक स्थैर्य याच बाबीतुन शहराचा इतिहास आणि अस्मिता टिकवून ठेवु शकतो .
शहराचे नाव बदलले तरी लोकांचे राहणीमान, उत्पन्न आणि जीवनशैली उंचावत नाही, तोपर्यंत विकास अपूर्णच राहतो.शहराचे, शहरासह तालुक्यातील माणसांच्या जीवनमरणासंबधीत अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत .त्यांची सोडवणूक करण्यासाठी पुरक सामग्रीची आवश्यकता आहे .या सामग्रीची काळजी /जुळवणी राजकीय सामाजिक स्तरावर करतांना कोणी दिसत नाही.अहिल्यादेवी होळकर यांच्या कतृत्वाचा ,पारदर्शी, सर्व समावेश, न्यायप्रिय कारभाराचा आदर्श आज तीनशे वर्षानंतरही समस्त राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असा आहे .
अहिल्यादेवी होळकर यांच्या जामखेड तालुका या पावनभुमीत अहिल्यादेवींना अभिप्रेत असे कोणते काम झाले आहे कींवा अहिल्यादेवी यांनी केलेल्या सर्वसमावेशक अशा कोणत्या कामासारखे काम करण्याची मागणी केली आहे ?? नावाची अस्मिता जपण्याबरोबर कर्तृत्वाची देखील जपावी. नेमके “नामांतरण” कोणत्या उद्देशाने ?? याचा विचार सर्व स्तरावर होणे आवश्यक आहे.