शासकीय वसतिगृहाचे अधिक्षक हाकतात उंटावरून शेळ्या
अधिक्षक सतत गैरहजर ; विद्यार्थ्यांचा सुरक्षा व जेवणासाठी अडचणींचा सामना
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड शहरातील संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतिगृह तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी एकच अधिक्षक आहे.
त्यांना सदर ठिकाणी किंवा जामखेड शहरात चोवीस तास रहीवासी असणे आवश्यक आहे. पण ते अहिल्यानगर येथे राहतात. तेथूनच उंटावरून शेळ्या हाकतात. आठवड्यातून एकदा येतात याबाबत तक्रार असताना जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत अहिल्यानगर येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंट्टीवार यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेतली असल्याचे सांगितले. साडेतीन महीन्यापूर्वी अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध शाळेत रॅंगीगचा प्रकार घडला होता सदर घटना देशात गाजली असताना जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.जामखेड शहरातील संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतिगृह तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाला प्रतिनिधीने मंगळवारी भेट दिली असता. वसतिगृहाचे अधिक्षक अनिल गर्जे यांच्याकडे या तीन वसतीगृहाचा पदभार आहे. ते तिनही ठिकाणी आढळून आले नाही. स्थानिक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता ते अहिल्यानगर येथे राहतात आठवड्यातून एकदा येतात. विद्यार्थ्यांना राहणे व जेवणाची व्यवस्था शासन करते. यासाठी अधिक्षक असणारे गर्जे यांना जामखेड शहरात अगर कोणत्याही एका वसतीगृहात उपलब्ध असणे आवश्यक आहे.
परंतु तेच आठवड्यातून एकदा येत असेल तर या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सेवा सुविधा व जेवणाची परस्थिती किती बिकट असेल याचा अंदाज येतो.जामखेड येथील या तिनही शासकीय वसतीगृहाच्या बाबत समाजकल्याण अहिल्यानगरचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंट्टीवार यांना सदर प्रकार निदर्शनास आणून दिला असता त्यांनी माहिती घेतो तसेच अधिक्षक पद भरले नसल्याने अनिल गर्जे यांच्याकडे तीन वसतीगृहाचा अधिक्षक पदाचा पदभार सांगितले. अधिक्षक यांनी स्थानिक ठिकाणी राहणे आवश्यक असून याबाबत अधिक माहिती घेतली जाईल असे सांगितले.
चौकट –
जामखेड येथील अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध शासकीय निवासी शाळा अरोळेवस्ती येथे असून तेथे सहावी ते दहावी पर्यंत वर्ग आहेत. इयत्ता आठवीच्या मुलांना नववीच्या मुलांनी लाथाबुक्क्याने व पट्ट्याने मारहाणीची घटना दि. २१ एप्रिल रोजी घडली. सदर घटना दोन दिवसांनी निवासी शाळा मुख्याध्यापक व अधिक्षक यांना माहीत झाला होता. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. शासनाने सदर घटनेची दखल घेऊन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंट्टीवार यांची नियुक्ती करून दोन दिवसात अहवाल दिला. त्या अहवालावरून मुख्याध्यापीका शोभा काबंळे यांच्यावर ठपका ठेवून निलंबीत करण्यात आले होते. सदर घटना घडून ही जबाबदार अधिकारी अहील्यानगर येथे राहतो याबाबत नागरिकांनी नाराजी दर्शवली.
सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलन : पांडुरंग माने
———–
जामखेड शहरात संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतिगृह तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात विद्यार्थी राहत असून शिक्षण घेत आहेत या तीनही वसतीगृहासाठी एकच अधिक्षक आहे व तो अहिल्यानगर येथे राहतो ही वस्तुस्थिती असून निंदनीय आहे.
साडेतीन महिन्यापूर्वी रॅंगीगचा प्रकार घडला असताना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन देऊन सुधारणा न केल्यास समाजकल्याण कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा भटक्या विमुक्त जाती व जमाती मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पांडुरंग माने यांनी दिला आहे.

