आतातरी अजित पवार यांच्यावरील बिनबुडाचे आरोप समुद्रात बुडवा
हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !
जामखेड प्रतिनिधी

ज्यांनी कायम स्वच्छतेचा आग्रह धरला, अशा अजित पवार यांच्यावर आरोपांचे डाग उडविले गेले. ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळात त्यांची प्रशंसा केली. त्यांच्यावरील आरोप कधी सिद्ध झाले नाहीत. ते आता आपल्यात नाहीत. पण, ते आरोप, ते डाग पुसले जावेत, असे वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे जीवलग मित्र होते. त्यांनी हे आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकून द्यावे, अजित पवार यांना हीच खरी आदरांजली ठरेल, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केल्या.
अजित पवार यांच्या अपघाताला जो कोणी जबाबदार असेल, मग तो कितीही मोठा का असेना, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय थांबणार नाही. सुनेत्रा पवार यांना जी काही राजकीय प्रवासात मदत लागेल तिथे पुतण्या म्हणून मी सदैव तयार असेन. काकांच्या स्टाईलने मी कायम महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहीन, असेही आ. रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना आ रोहित पवार यांना भरून आले होते.
अजित पवार यांचे वय ६६ वर्षे ६ महिने ६ दिवस होते. त्यांच्याकडे ४० वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता. १९८२ मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते निवडून आले. तिथून उपमुख्यमंत्री पद असा त्यांचा प्रवास होता. त्यांना अधिक काळ मिळाला असता तर कदाचित ते मुख्यमंत्री देखील होऊ शकले असते.
कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराज शाळेत शिकायला गेल्यानंतर त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा पगडा बसला. त्यांचे वडील लवकर गेले. त्यानंतर
शरद पवार यांनी पोटच्या मुलासारखे वाढवले. शेतकऱ्यांबद्दल त्यांना नेहमी आद असायचा. राजकारणात ते २३ व्या वर्षी आले. विविध पद भूषविली. जनतेच्या हितासाठीच त्यांनी काम केले.
चांगल्या अधिकाऱ्यांना त्यांनी कायम विश्वासात घेतले. त्यांच्याबद्दल काहींना गैरसमजही होते. त्यांचा स्वभाव कडक आहे,असे म्हणायचे. पण, ते फणसासारखे होते. सामान्यातील सामान माणसांची कामे प्राधान्याने करायचे. चांगले चित्र, कलाकृत जुनी गाणी ऐकायला त्यांना आवडायचे. जुने चित्रपट बघायलाही त्यांना आवडायचे असेही आ रोहित पवार म्हणाले.
पत्रकार यासीन शेख 9423391215
