सरसकट बंदी नको, नियमांचे बंधन घाला कर्ज कसे फेडायचे, उपजिविका कशी करायची ? डीजे व्यावसायिकांचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण
सरसकट बंदी नको, नियमांचे बंधन घाला
कर्ज कसे फेडायचे, उपजिविका कशी करायची ?
डीजे व्यावसायिकांचे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण
सिटीझन प्रतिनिधी
राज्यात गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात ध्वनीप्रदूषणाचे नियम कडक केल्यामुळे सध्या डीजे आणि साऊंड सिस्टीम चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे कडक निर्देश आणि शासनाच्या भूमिकेमुळे पोलिसांकडून राज्यभरात डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
डीजे ध्वनिवर्धक यंत्रणांवर लावण्यात येणाऱ्या सरसकट बंदीमुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डीजेवर बंदी घालण्याऐवजी ध्वनी मर्यादा व वेळेचे नियम निश्चित व कडक करून त्यांचे पालन करण्याचे बंधन घालावे, अशी मागणी साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या
मागण्यांसाठी असोसिएशनच्या व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण आमरण उपोषण सुरू केले आहे.
शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादा आणि वेळेच्या नियमांचे पालन करण्यास डीजे व्यावसायिक तयार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी; मात्र सर्वच व्यावसायिकांना दोषी ठरवून सरसकट निर्बंध लादणे योग्य नाही, अशी भूमिका
आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे मांडली.
डीजे व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतलेली साऊंड सिस्टीम आता या कडक नियमांमुळे आणि बंदीमुळे गोदामात धूळ खात पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो तरुण आर्थिक संकटात सापडले आहेत.
डिजे व्यवसायावर चालक
ऑपरेटर, कामगार तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. व्यवसायातील गुंतवणुकीसाठी अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले असून वाढते व्याजदर आणि विविध निर्बंधांमुळे आर्थिक अडचणी वाढल्याचे व्यावसायिकांनी
सांगितले. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा विचार करून शासनाने धोरण ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे .
▶ आमच्यावर बंदी नको, बंधन घाला
———–
पालन करण्याची तयारी असल्याचे व्यावसायिकांनी स्पष्ट केले. शासनाने सरसकट बंदीऐवजी नियमबद्ध पद्धतीने व्यवसायाला परवानगी देऊन व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

———————-
डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यासाठीची परवानगी प्रक्रिया सुलभ, स्पष्ट आणि पारदर्शक करावी. ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादा व वेळेच्या नियमांचे पालन करून डीजे वाजविण्यास परवानगी द्यावी. सार्वजनिक मिरवणुका वगळता लग्नसोहळे आणि इतर शुभकार्यांसाठी पोलीस परवानगीची अट शिथिल करावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली. तसेच डीजे व्यावसायिक व ऑपरेटर यांच्यावर होणारे हल्ले आणि गैरवर्तन रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, मिरवणुकीच्या वेळी गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते डीजेचा आवाज वाढवण्यासाठी किंवा तो लावण्याबाबत दबाव आणतात. यावर बंधन घालण्यात यावे.अशी मागणीही करण्यात आली.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!