मालमत्ता थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा :- मूख्याधिकारी अजय साळवे
जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील थकबाकीदारांना मालमत्ता करावरील ५०% शास्ती माफीची ‘अभय योजना’ जाहीर.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद हद्दीतील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यासाठी ‘अभय योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, थकबाकीदारांना एकूण शास्ती रकमेच्या ५० टक्के पर्यंत शास्ती कर माफ करण्यात येत असून या अभय योजनेचा जामखेड नगरपरिषद हद्दीतील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाद्वारे १९ मे २०२५ रोजी नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना राबवण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला होता.
राज्यातील नगरपरिषद क्षेत्रामध्ये अनेक वेळा मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम जास्त असणे, मालमत्ता धारकांची आर्थिक अडचण असणे व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १५० (अ) १ नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर नगरपरिषदेकडून दरमहा २% शास्ती लावण्याचे प्रावधान आहे.
त्यामुळे मालमत्ता धारकाच्या एकूण थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन त्याचा विपरीत परिणाम कर वसुलीवर होतो.
यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुल करण्यासाठी प्रोत्साहन मिळवण्याच्या दृष्टीने अभय योजना शासनाने लागू केली आहे.
त्यानुषंगाने नुकतीच
जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यासाठी ‘अभय योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, थकबाकीदारांना एकूण शास्ती रकमेच्या ५० टक्के पर्यंत शास्ती माफ करण्यात येत आहे.
याबाबत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या प्रस्तावानुसार एकूण शास्तीच्या ५० टक्के म्हणजेच रु. ३,७४,३९,७८७/- (तीन कोटी चौहत्तर लाख एकोणचाळीस हजार सातशे सत्याऐंशी रुपये) इतक्या रकमेच्या शास्ती माफीस मंजुरी दिली आहे.
या योजनेच्या अटी व शर्ती:या अभय योजनेचा लाभ फक्त त्याच मालमत्ता धारकांना मिळेल, जे दि.३१/०३/२०२५ पर्यंतच्या त्यांच्या मूळ मालमत्ता कराचा भरणा दि. ३१/०३/२०२६ पर्यंत करतील. दि. ३१/०३/२०२५ पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करावरील ५०% शास्ती माफी या योजनेअंतर्गत मिळेल.
दि. ३१/०३/२०२६ नंतर शास्ती माफीसाठी येणाऱ्या कोणत्याही प्रकरणाचा विचार केला जाणार नाही.तरी जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील थकबाकीदार मालमत्ता धारकांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घेऊन आपला थकीत मालमत्ता कर आणि ५०% भरलेली शास्ती तत्काळ नगर परिषद कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज भरून या अभय योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी यावेळी केले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
