भटके-विमुक्त हे भारताचे नागरिक आहेत का नाहीत ??
भटक्या विमुक्तांची घर गणना, जन गणना कशी करणार ??
अँड अरूण जाधव यांचा शासनाला सवाल
“मुशाफिरी यात्रा” द्वारे भटक्या ४२ जातींमध्ये जनजागृती करणार

जामखेड प्रतिनिधी
सध्या घरगणना मोहीम सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे . घरगणनेनंतर जनगणना होणार आहे . मात्र भटके विमुक्तांच्या पालाची, कुडाची, कोपीची घर गणना होणार नाही. कारण शासकीय घर गणनेच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये पाल, कुड व कोपीचा रकानाच नाही मग भटके-विमुक्त या देशाचे नागरिक नाहीत का? यांची घर गणना व्हायला नको का? असा सवाल भटके विमुक्तांचे राज्याचे नेते अँड अरूण जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला केला आहे . अँड अरूण जाधव भटके विमुक्तांच्या ४२ जातींमध्ये जनजागृती करण्यासाठी मुशाफिरी यात्रा काढत राज्यभर दि ५ मे ते १५ मे २०२६ या काळात जनजागृती करणार आहे .याबाबत माहिती देण्यासाठी जामखेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते .
अँड अरूण जाधव यांनी सरकारला खडे सवाल केले .
ते म्हणाले की
घर गणनेनंतर जनगणना होणार आहे. भटके-विमुक्त सतत भटकंती करीत राहतात कारण त्यांना उपजिवीकेचे दुसरे साधन नाही. मग यांची जनगणना कशी होणार ? जनगणनाच नाही तर भटके-विमुक्तचे बजेट कसे बनणार ? बजेट नसेल तर भटके-विमुक्तांना व्यक्तीगत लाभाच्या योजनांचा फायदा कसा होणार ? तसेच त्यांच्या विकासासाठी निधी कसा उभा करणार ? असे अनेक प्रश्न भटके-विमुक्तासमोर उभे आहेत. यातुन संविधानिक मार्ग शासनाने काढावा कारण अन्न, वस्त्र, निवारा हे मुलभूत अधिकार संविधानाने आम्हाला दिले आहेत. मग संविधानाचीच पायमल्ली होतेय असे भटके-विमुक्तास वाटते. आम्हाला संविधानिक न्याय मिळाला पाहिजे.
भटक्या विमुक्त यांची जनगणना स्वतंत्र व्हावी यासाठी आम्ही भटक्या विमुक्त समाजाचा मुसाफिरी दौरा काढत आहोत.
पुढे बोलताना अरूण जाधव यांनी सवाल केला की “भटके-विमुक्त हे भारताचे नागरिक आहेत का नाहीत ? हा प्रश्न आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. देशभरात जनगणना सुरू असताना त्यामध्ये आमच्या भटक्या विमुक्तांचे अस्तित्व कुठेच नोंदले जात नाही. आमच्या भटक्या विमुक्तांकडे ना आधार कार्ड, ना रहिवासी दाखला, ना जन्माचा पुरावा आणि मृत्यूनंतर पुरण्यासाठीची जागा नाही. मग आमच्या भटक्या विमुक्तांनी भारताचे नागरिक असल्याचे सिद्ध कसे करायचे आत्ता जी घरगणना सुरु आहे यात आमच्या भटक्याचा पालाचा समावेश करणार आहात का नाही ? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे शोधणेसाठी मी उतरतोय रस्तावर तुमची साथ हवी आहे असे आवाहनही त्यांनी केले .
.राजवटीत १८७१ साली गुन्हेगार जमाती कायदा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरोधात लढणाऱ्या आमच्या भटक्या-विमुक्तांच्या अनेक जमातींना गुन्हेगार घोषित करण्यात आले. देशभरातील सुमारे २५० पेक्षा जमाती या कायद्याखाली होत्या. १९५२ मध्ये हा कायदा रद्द करण्यात “म्हणून बेस्तर, कंजारभाट, टकारी, पामलेर, मांगगारूडी, भामटा, छप्परबंद अशा ९ विमुक्त जाती-जमाती आहेत. या सर्व आमच्या भटक्या विमुक्तांच्या जमाती आहेत. यांना कायद्याने गुन्हेगार ठरवल तर देशातील ९८ जमातींना गुन्हेगार ठरवले.
आमच्या भटक्या विमुक्त जमातींना कायमस्वरूपी वास्तव्य नसते. उदरनिर्वाहासाठी भटक्या विमुक्तांना गावोगावी भटकंती करावी लागते. त्यामुळे भटक्या विमुक्तांच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद शासनाकडे राहत नाही. १९५० च्या दशकात बॉम्बे प्रेसीडेन्सीत भटक्या जमातींची पहिली यादी तयार करण्यात आली. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर एल. बी. थाडे समितीने या यादीत बदल करून नवीन यादी तयार केली. त्यावेळी २८ जमातींचा समावेश करण्यात आला होता. नंतर विविध भटक्या समूहांनी निकष पूर्ण केल्याने त्यांचा समावेश करण्यात आला आणि आज आमच्या भटक्या विमुक्त जमातींची संख्या ४२ झाली आहे. यात वैदू, डोंबारी, माकडवाले, नंदीवाले, गोसावी, लोहार, घिसाडी, मरीआईवाले, कोल्हाटी अशा इतर भटक्या विमुक्त जमातींचा समावेश आहे.
आमच्या भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाचा इतिहास देखील संघर्षमय आहे. १ नोव्हेंबर १९४९ रोजी तत्कालीन बॉम्बे प्रेसीडेन्सीत मागास समाजांसाठी आरक्षण लागू करण्यात आले होते, ज्यात आमच्या भटक्या विमुक्त समाजाचाही समावेश होता. पुढे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर १८ ऑक्टोबर १९६० रोजी एल. बी. थाडे आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने आमच्या भटक्या विमुक्त जमातींची संख्या, उपजीविकेची साधने आणि सामाजिक परिस्थिती यांचा सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला. आयोगाने महाराष्ट्रातील विमुक्त, भटके आणि निमभटके समाजांची यादी तयार करून आमच्या भटक्या विमुक्तांची अंदाजित लोकसंख्या ११.९५ लाख असल्याचे नमूद केले.
आजही आमच्या भटक्या विमुक्त समाजाची खरी लोकसंख्या शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आमच्या भटक्या विमुक्तांसाठी शिक्षण, आरक्षण, निवारा, आरोग्य आणि रोजगाराच्या योजना प्रभावी पणे राबवल्या जात नाहीत. म्हणूनच आमच्या भटक्या विमुक्त समाजाची स्वतंत्र घरगणना व्हावी, आमच्या अस्तित्वाला अधिकृत मान्यता मिळावी आणि घटनात्मक अधिकार मिळावेत यासाठी महाराष्ट्र भर मुशाफिरी संवाद यात्रा काढण्यात येत आहे. ही संवाद यात्रा केवळ जनजागृतीसाठी नसून, आमच्या भटक्या विमुक्त समाजाच्या अस्मिता, अधिकार आणि अस्तित्वाच्या लढ्याची हाक आहे.
मी तुमच्या घरातील पालातील लेकरू आहे. दगडाच्या चुलीचा भाऊ आहे. मला साथ द्या. असे आवाहन अरूण जाधव यांनी केले
