जामखेड कलाकेंद्रातील नर्तिकेची जाळून हत्या
अंतर्गत वादाचा अमानुषपणे दुर्दैवी अंत
चारजण ताब्यात दोन जण फरार
पोलीसांनी केली तीन दिवसात हत्याकांडाची उकल
पोलीस सप्तसुरपर्यत ?

सिटीझन प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील एका सांस्कृतिक कलाकेंद्रातील अंतर्गत वादातून एका गर्भवती नर्तिकेची जाळून अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुर्दैवी मृत नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (३१, रा. रायगड) ही अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रावर काम करत होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंकी हनुमंत काटकर ही जामखेड येथील कलाकेंद्रात काम करत होती. कलाकेंद्रातील अंतर्गत वादातून आरोपींनी तिचे अपहरण केले आणि तिला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील एका घरात नेऊन बेदम मारहाण केली. या भीषण मारहाणीत पिंकी बेशुद्ध पडली.
पिंकीचा मृत्यू झाला आहे असा गैरसमज आरोपींचा झाला. त्यानंतर गुन्ह्याचा आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी तिला एका चारचाकी वाहनातून २७५कीलोमीटर धुळ्याच्या दिशेने नेले.
तेथून पुढे राजस्थानला पळून जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरातील निर्जन जंगलात वाहन थांबवून तिच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि तिला जाळण्यात आले.
सदर हत्याकांड दि २२ सप्टेंबर रोजी घडले असुन धुळे आणि जालना पोलीसांच्या तीन दिवस संयुक्त तपासात उघड झाले.महामार्गावरील एका संशयास्पद चारचाकी वाहनाच्याहालचालींवरून धुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तब्बल ११ तास सलग तपासणी केली.
या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना संशयित वाहनाचा माग काढण्यात यश आले आणि पोलिसांनी या हत्याकांडातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.पोलीसांनी अद्याप सहा आरोपींची ओळख पटवली असुन चार आरोपी अटकेत,तर दोघे अद्याप फरार आहेत .यामध्ये सरफराज उर्फ शफिक मोमीन (वय ३५, रा. कळंब, धाराशिव),आरिफ उर्फ खुज्या शेख (वय ३१, रा. कळंब, धाराशिव),स्वाती उर्फ आरती कुऱ्हाडे (वय २८, व्यवसाय -कलाकार, सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्र, जामखेड) लक्ष्मी पवार (वय ३०, रा. कळंब, धाराशिव) या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन बीड व धाराशिव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तर फारुख शेख (रा. कळंब, धाराशिव) आणि रोहिणी जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा तीव्र शोध घेत आहेत. निष्पन्न झालेल्या आरोपींपैकी चौघे जण धाराशिव जिल्ह्यातील आहेत.
ही कारवाई. पोलीस अधिक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिव संजय पवार यांचे मार्गदर्नाखाली पोलीस निरीक्षक शफीक शेख, सपोनि समाधान बजबळकर, पोहेकॉ महादेव मुंडे, पोद्रेका अजीज शेख मपोस/सपना गिते यांच्या पथकाने पथकाने केली.
या भयानक घटनेमुळे जामखेड परिसरात आणि कलाक्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.जामखेडमधील सांस्कृतिक कला केंद्रात एका गर्भवती नर्तिकेची झालेली अमानुष हत्या अत्यंत संतापजनक आहे.कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या या केंद्रात अंतर्गत वादातून घडलेल्या या घटनेने संपूर्ण कलाक्षेत्राला काळिमा फासला आहे.
विशेष म्हणजे, जामखेड मधील कलाकेंद्रामध्ये यापूर्वीही गोळीबार ,चाकूने हल्ला आणि ‘हाफ मर्डर’ आरोपींना आश्रय देणे, हाणामाऱ्या सारखे गंभीर गुन्हे घडल्याचे समोर येत आहे, अशा घटना या कलाकेंद्राच्या सुरक्षिततेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215