Homeव्हिडिओ बातम्यायूग बदलले तरी न बदलणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक होय! शिक्षक केवळ धड्यांचे...

यूग बदलले तरी न बदलणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक होय! शिक्षक केवळ धड्यांचे नव्हे तर जीवनाचे शिल्पकार असतात

युग बदलले तरी न बदलणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक होय:

शिक्षक केवळ धड्यांचे नव्हे, जीवनाचे शिल्पकार असतात.

जामखेड प्रतिनिधी

५ सप्टेंबर हा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक पान नाही. तर भारताचे दूसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीने उजळलेला, शिक्षकांना वंदनाचा पवित्र सोहळा आहे. शिक्षक ते राष्ट्रपती शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून सरकारने १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरवात केली.
या दिवशी आपण त्या गुरुजनांना स्मरतो. जे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाची वाट दाखवतात.

शिक्षक केवळ धड्यांचे नव्हे, जीवनाचे शिल्पकार असतात. विद्यार्थी जीवनातील पहिला आदर्श म्हणजे शिक्षक. ते फळ्यावरच्या खडूप्रमाणे स्वतः
झिजतात पण ज्ञानाच्या ओळी विद्यार्थ्यांच्या अंतरंगात कोरतात. किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षक म्हणजे स्वप्न जागवणारे, प्रश्नांचे निरसन करणारे आणि भविष्याची दिशा दाखवणारे दीपस्तंभ. आपल्या संस्कृतीत शिक्षकाला म्हणजे गुरूला मानाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत गुरूंची म्हणजे शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते. शिक्षक हा केवळ मार्गदर्शक नसतो तर तो जीवनाला दिशा दाखवणारा दिशादर्शक असतो. भारतीय शिक्षण परंपरेत गुरू शिष्यांचा संबंध अत्यंत पवित्र मानला आहे. आजच्या वेगवान जीवनात विद्यार्थी अनेकदा भरकटतात, स्पर्धा, व्यसनाधीनता, चुकीचे मित्र परिवार यामुळे मार्ग चुकतात. अशावेळी शिक्षक हा सल्लागार, मित्र आणि मानसिक आधार ठरतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षक आज जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेशले आहे. एका क्लिकवर माहिती उपलब्ध आहे. पण कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ उत्तरं देऊ शकते, जीवनाचा अर्थ शिकवू शकत नाही. प्रेरणा, मूल्ये, संस्कार – ही देणगी केवळ शिक्षकच देऊ शकतो. त्यामुळे यंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाचे स्थान अद्वितीयच राहणार आहे. व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. किशोरवयीन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, मूल्ये, शिस्त, समाजाभिमुखता है शिक्षकांच्या मार्गदर्शनातून घडते. पालक आणि शिक्षक दोघे मिळून विद्यार्थ्याला उंच भरारी घेण्यासाठी पंख देतात. पालक घराचा पाया घालतात, तर शिक्षक त्या पायावर संस्कारांचे व ज्ञानाचे भव्य मंदिर उभारतात.

यानिमित्ताने शिक्षकदिनाचा संदेश असा सांगता येईल… प्रिय विद्यार्थ्यांनो, शिक्षक दिन हा केवळ पुष्पगुच्छ अर्पण करण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे शिक्षकांच्या शिकवणीला कृतीत आणण्याचा, समाजासाठी काही करण्याचा संकल्प करण्याचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातून शिक्षकांच्या मूल्यांना उजाळा देण्याचा. शिक्षक हे राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. ते जे बीज विद्यार्थ्यांच्या मनात पेरतात, त्यातूनच भविष्याचे विशाल वटवृक्ष उभे राहतात. आजच्या यंत्रयुगातही आहेत. कारण, ज्ञानाला जीवनाचा सुवास आणि माहितीला मूल्यांचा अर्थ देण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांकडेच आहे. गुरुंच्या स्पर्शाशिवाय ज्ञान अधुरे आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन दिशाहीन आहे. आजच्या या शिक्षक दिनी देशभरातील शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!