झाडे पडली, फळबागा उन्मळल्या, शेती जलमय
जामखेड तालुक्यात पावसाचा धुमाकूळ : शेतीपिकांचे मोठे नुकसान, तातडीने पंचनामे करण्याची मागणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मे महिन्यात तब्बल पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेती, फळबागा आणि जनजीवन यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
सध्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी शेतातील ओलावा सुकण्याची वाट पाहत आहेत. मात्र, सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे ही तयारी रखडली आहे. मंगळवारी दिवसभरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली आहेत. काही गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
शेतात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य दिसत आहे. या पावसाचा फळबागांना मोठा तडाखा बसला असून जवळा, हळगाव, पिंपरखेड, फक्राबाद, मतेवाडी परिसरातील लिंबोणीची झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
कांदा उत्पादकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. ओलसर हवामानामुळे कांद्याची साठवणूक आणि गुणवत्ता दोन्ही प्रभावित झाले असून
कांदा सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासोबतच आधीच बाजारात कांद्याचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे.
चोंडी गावात अक्षय सत्यवान सोनवणे यांच्या चालू असलेल्या घरकुलाच्या बांधकामाची भिंत कोसळल्याची घटना घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी शासकीय मदतीची मागणी केली आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाचा हलगर्जीपणा ?
राज्यभरात पावसाचा इशारा देण्यात आलेला असतानाही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही पूर्वतयारी करण्यात आलेली नाही. आपत्कालीन परिस्थितीत तलाठ्यांनी आपल्या सजामध्ये राहणे बंधनकारक असतानाही, अनेक ठिकाणी प्रशासनाचा प्रतिसाद उशिराने मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.
वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारांवर परिणाम होऊन अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी दिवसभर अंधार कायम राहिल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
