जामखेडची संस्कृती कोळेकर राज्यात प्रथम :
४० कीलोमीटर रोज प्रवास करत शिक्षण घेतले.
जामखेड प्रतिनिधी
: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षेत जामखेड येथील संस्कृती ज्ञानेश्वर कोळेकर हिने ५०० पैकी ४९८ गुण मिळवत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
संस्कृती ही मूळची जामखेड येथील असून, आष्टी येथील वसुंधरा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. संस्कृती हिला हिंदी विषयात १०० पैकी १००,
ॲड टेक्नॉलॉजी १०० पैकी १००, सोशल सायन्स १०० पैकी १००, तर मराठीत १०० पैकी ९०, इंग्लिशमध्ये १०० पैकी ९९, गणितात १०० पैकी ९९ गुण मिळाले आहेत. अशाप्रकारे तिने ४९८+२ असे गुण मिळवून संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
या तिच्या यशामध्ये वसुंधरा प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष मनोरंजन धस, शाळेचे मुख्याध्यापक मंगेश भालेराव तसेच मुख्याध्यापिका सीमा बोंदार्डे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
माझे पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेड येथे झाले तर चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वसुंधरा माध्यमिक विद्यालय, आष्टी येथे झाल्याचे संस्कृती कोळेकर हिने सांगितले. ती पुढे म्हणाली की, गेली ७ वर्षे जामखेड ते आष्टी, असा दररोज ४० किलोमीटरचा प्रवास करून शारीरिक थकवा येत होता; परंतु वेळेचे नियोजन केल्याने यश मिळवणे सोपे झाले. या यशामागे माझ्या आईची खास मेहनत आहे.
वसुंधरा शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडे बारीक लक्ष दिले जाते. त्यांच्या क्षमता प्रत्येक शिक्षकांना माहीत असतात.
वसुंधरा शाळेमध्ये मीच नव्हे तर माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. वसुंधरा प्रशाला ही शाळा नसून एक कुटुंब असल्याचे शेवटी तिने सांगितले. ग्रामीण भागातील मुलीने एवढे मोठे यश मिळवल्याने तिचे तालुक्यासह जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
