Homeव्हिडिओ बातम्याडीजे संस्कृतीला विरोध म्हणजे उत्सवाला विरोध नव्हे. नागपुर ,सोलापूर ,परभणी, भंडारा...
डीजे संस्कृतीला विरोध म्हणजे उत्सवाला विरोध नव्हे. नागपुर ,सोलापूर ,परभणी, भंडारा ,पुण्यात डीजेला बंदी;मग इथं का नाही? जामखेडमध्ये नियमांचे पालन करत वाजवा ??? कायदा नियम इथून तिथून एकच आहे मग इथे बगल का?? नियमांच्या आधीन रहा ; पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी
डीजे संस्कृतीला विरोध म्हणजे उत्सवाला विरोध नव्हे !
नागपुर ,सोलापूर ,परभणी, भंडारा ,पुण्यात डीजेला बंदी;मग इथं का नाही?
जामखेडमध्ये नियमांचे पालन करत वाजवा ???
कायदा नियम इथून तिथून एकच आहे मग इथे बगल का??
नियमांच्या आधीन रहा ; पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी
जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्रात सध्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाकडुन नियमावली तयार करण्यात येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने मानसिक, सामाजिक शांततेला बाधा आणणाऱ्या डीजे वाद्यावर बंदी घातली जात आहे.महाराष्ट्र राज्यातील नागपूर, सोलापूर, भंडारा आणि परभणीसह काही जिल्ह्यांमध्ये आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कायदा नियम इथून तिथून एकच आहे मग जामखेडला नियमात बगल का ? इथे का डीजे बंदी नियम लागू केला जात नाही .
नूकतेच पुण्यात डीजेबंदीसाठी विद्याधर बापट या तरूणाने महानगरपालिकेच्या बैठकीत आक्रमक पावित्रा घेतला. त्यासंदर्भात जनजागृती करत डीजेबंदी कशी गरजेची आहे, यावरून त्यांनी मत मांडायला सुरूवात केली. त्यावरून त्यांना मारहाण देखील झाली. पुण्यात खरंतर वैचारिक वाद व्हायला हवे होते, मात्र ते न होता, धक्काबुक्की, मारहाणपर्यंत हे प्रकरण पोहोचले. यासंदर्भात विशेष लिहिण्याचे प्रमुख कारण म्हणजे नागपुरात पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी थेट डीजेबंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे डीजे वाजवण्यावर कारवाई होणार आहे. असे आदेश सर्वत्र का निघत नाहीत.
न्यायालयाने प्रशासनाने डीजे ,लेजर शोला बंदीचा आदेश दिला आहे .मग प्रशासनाकडुन थेट भूमिका का घेतली जात नाही. मुळातच कोणत्याही सण-उत्सवांमध्ये डीजे नकोच अशीच भूमिका घेण्याची खरी गरज आहे. महापुरूषांच्या जयंत्यांच्या वेळी देखील डीजे नको, त्याऐवजी पारंपारिक वाद्य आहेत, त्यासोबतच कृतीशील कार्यक्रम राबवून समाजाला एका उंचीवर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहण्याची खरी गरज आहे. मात्र त्याकडे सातत्याने आपण दुर्लक्ष करत समाजाची पातळी कशी खाली नेता येईल, समाजाच्या आरोग्याचा प्रश्न होईल ,समाजाच्या सार्वजनिक शांततेचा भंग होईल याचदिशेने आपले प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव आहे. या उत्सवातून जनजागृती करत समाजाला जागे करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. त्याचीच पुढचे पाऊल
टाकत आपण या उत्सावातून समाजाला नवे संदेश देण्याची खरी गरज आहे. समाजाला एकत्र आणून त्यांच्याच एकोपा कसा नांदेल ते जपण्याची खरी गरज आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कोणताही उत्सव असो त्यामध्ये ध्वनिप्रदूषण, लेझर शो किंवा कानठळ्या बसवणारा डीजे नकोच. त्यामुळे नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजे, अतिप्रखर लेझर आणि बेसुमार ध्वनिप्रदूषणावर कठोर भूमिका घेतली, तेव्हा प्रश्न फक्त नागपूरपुरता राहिला नाही. तो संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभा राहिला-नागपुरात नियम लागू होतात, मग पुण्यात का नाही? राज्यातील इतर ठिकाणी पोलीस प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे पालन का करत नाहीत .मुळातच राज्य सरकारने बोटचेपी भुमिका न घेता सरसकट यावर कठोर भूमिका घेत संपूर्ण महाराष्ट्रात डीजेबंदी करण्याची गरज आहे.
खरं तर पुण्याकडे या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर देण्याची क्षमता आहे. ढोल-ताशा ही पुण्याची ताकद आहे. पारंपरिक वाद्ये, लेझीम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि शिस्तबद्ध मिरवणुका यांमुळेच पुण्याचा गणेशोत्सव देशभर प्रसिद्ध झाला. ही परंपरा जपत आधुनिकतेचा स्वीकार करणे शक्य आहे; पण आधुनिकतेच्या नावाखाली ध्वनिप्रदूषणाचा स्वीकार करणे आवश्यक नाही. राज्य सरकार आणि गृह विभागानेही आता स्पष्ट धोरण जाहीर करण्याची गरज आहे. प्रत्येक शहरासाठी वेगवेगळे निकष न ठेवता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची राज्यभर एकसमान अंमलबजावणी व्हायला हवी. पोलिसांनी परवानगी प्रक्रियेत स्पष्ट अटी घालाव्यात, ध्वनीमर्यादा काटेकोरपणे तपासाव्यात, लेझर उपकरणांवर नियंत्रण ठेवावे आणि नियम मोडणाऱ्यांवर कोणताही राजकीय दबाव न मानता कारवाई करावी. त्याचबरोबर गणेश मंडळांनाही आत्मपरीक्षण करावे लागेल.
प्रतिष्ठा ही स्पीकरच्या आकाराने मोजली जाऊ नये; ती समाजासाठी केलेल्या कामाने मोजली जावी. ज्या मंडळांनी शांत, सुरक्षित आणि सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा केला, त्यांनाच समाजाने आदर्श मानले पाहिजे. नागपूरने एक संदेश दिला आहे-उत्सवाला विरोध नाही; बेफाम दणदणाटाला विरोध आहे. आता पुण्यानेही तो संदेश समजून घ्यायचा का, हा निर्णय फक्त पोलिसांचा नाही; तो प्रशासन, मंडळे आणि नागरिक या तिघांचाही आहे. शेवटी प्रश्न डीजेचा नाही, तर न्यायाचा आहे. जर कायदा नागपुरात लागू होतो, तर तो राज्यात तितक्याच ताकदीने लागू व्हायलाच पाहिजे .नागपूर शहरात डीजे, डॉल्बी साऊंड, मॉडिफाइड साऊंड सिस्टिम, डीजेची वाहने तसेच बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावर १ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. गुरुवार, ३ सप्टेंबरच्या रात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार असून, आगामी सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक तसेच संबंधित कार्यक्रमांमध्ये प्रतिबंधित साउंड सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. 
नागपूर शहरात ४ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरे होणार आहेत. यामध्ये गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबा छब्बीसवी, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दुर्गादेवीच्या मूर्तीच्या आगमन-विसर्जन मिरवणुका यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सण-उत्सव साजरे होणार आहे, तेही डीजेविना. त्यामुळे ज्याची सुरूवात पुण्यातून होण्याची अपेक्षा होती, त्याची सुरूवात नागपुरातून होत आहे. त्यासोबतच पुण्यातून ज्या विद्याधर बापट यांनी जनजागृती केली, आवाज उठवला त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तो त्यांना मारहाण करून. खरंतर आज समाजात पुढे येणाऱ्यांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सण-उत्साव कसे साजरे केले पाहिजे, याबाबत बोललांत तर तुम्हाला देशद्रोही बनवण्यापर्यंत अनेकांची पातळी घसरली आहे. त्यामुळे या चिखलात कुणी उतरण्याची हिंमत करत नाही. अशावेळी ती हिंमत बापट यांनी केली आहे. अशावेळी त्यांच्यासोबत असण्याची गरज आहे. त्यासोबतच केवळ नागपुरातच नाही, तर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात डीजेबंदी झाली पाहिजे. ती केवळ ठराविक कार्यक्रमापुरतीच नको, तर ती वर्षभर असायलाच हवी. कारण त्या डीजेपासून विद्यार्थी, रूग्ण, यासारख्यांची जी हेळसांड होते, त्यावरून त्यांना शांततेत जगण्याचा अधिकार नाही का? त्यांच्या मूलभूत अधिकारांचे काय? असा देखील सवाल उपस्थित होतो.
——
नियमांच्या आधीन रहा:- पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी ———-
जामखेडमध्ये गणपती व इतर उत्सवात डीजे वाद्याचा मोठा सहभाग असतो .मंडळांनी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. उत्सवांचा पारंपारिक, सांस्कृतिक वारसा जपावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ यांनी केले .मात्र यावेळी अनेक मंडळांनी सांगितले की जुने,पारंपारिक वाद्य आज उपलब्ध नाही. सनई -चौघडा ,ढोल- ताशा, पिपाणी, लेझीम पथक असे कर्णमधुर वाद्य काम करणारे काळात ओघात फारच कमी झाले आहे.ते उपलब्ध होणे शक्य नाही .तेव्हा पोलीसांकडून प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी जाऊन डिजे वाद्याच्या आवाजाची तीव्रता तपासणी केली जाईल .नंतर ती नियमांच्या आधीन आवाजात वाजविण्याची परवानगी दिली जाईल .असे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.
मात्र पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या सांगण्याला खरच गणेश मंडळं योग्य प्रतिसाद देतील का ?? डिजेचा आवाज नियमांच्या चौकटीत ठेवतील का ? डिजेच्या त्रासाची कोणी तक्रार केली तर पोलीस प्रशासन दखल घेईल का ? असे नागरिकांमधून विचारले जात आहेत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!