जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या मागणीला यश आले असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या मागणीनुसार आणि नंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार आज कुकडी प्रकल्पाचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे मतदारसंघातील ५४ गावांना पिण्यासाठी तसेच चारा व इतर पिकांना पाणी देण्यासाठी या आवर्तनाचा उपयोग होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मतदारसंघातील पाण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यातही कर्जत-जामखेड मतदारसंघातील कुकडी कालवा हा महत्त्वाचा असून ५४ गावांमधील शेती या कालव्यावर अवलंबून आहे.
मतदारसंघामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार या पार्श्वभूमीवर मागे दोन महिन्यापूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. तसेच नंतर पुन्हा याबाबतचे पत्र त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले होते. त्यानुसार कुकडीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून याचा फायदा चारा पिके, फळबागा, उन्हाळी पिकांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. तसेच या पाण्याने शेततळे देखील भरून घेण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून त्यांच्याकडून आमदार रोहित पवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत…
कोट
‘‘सध्या दुष्काळी पार्श्वभूमी असल्यामुळे मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांनाही पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे या पार्श्वभूमीवर या आवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे. माझी मागणी मान्य केल्याबद्दल जलसंपदा विभागाचे मनापासून आभार !’’
रोहित पवार