जामखेड प्रतिनिधी
जलसंधारण मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आपल्या भागात प्रभावीपणे राबवली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जामखेड तालुक्यातील एकाही गावात टँकर लागला नाही. मी मंत्री असताना तहसील, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, न्यायालय, शासकीय होस्टेल या इमारती उभारल्या. तसेच खर्डा, सोनेगाव व शिऊर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. याची कोणीही मागणी केली नव्हती. पण आपल्या भागातील लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि प्रश्न मार्गी लावले. विधानपरिषदेचा आमदार झाल्यापासून मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करतोय. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठ्या उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढदिवसानिमित्त गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी जामखेड तालुक्यातील हळगाव, बावी, खांडवी, जामखेड, रत्नापुर, पाटोदा, डोणगाव या ठिकाणी आमदार प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. 31 डिसेंबर 2023 रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या दौर्याची सुरुवात हळगाव येथून झाली. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, आठ दिवस गडी कामाला लावायचे आणि बायका पोरं घेऊन परदेशात जायचं असं काम मी करत नाही. मतदारसंघातील जनतेत राहूनच मी माझा वाढदिवस साजरा करत असतो असे म्हणत आमदार शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. येणाऱ्या कालखंडामध्ये कोणाच्या नादाला लागू नका. भूलथापांना बळी पडू नका. मागच्यावेळी नादंवादं लागून जी चुक केली ती पुन्हा करू नका, आता आपलाच नाद करा. आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, या भागातल्या, परिसरातल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या माझ्या एवढ्या कोणालाच माहित नाहीत. त्या मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद आला पाहिजे. प्रगती झाली पाहिजे. त्यादृष्टीने माझा नेहमी प्रयत्न असतो. तुमचा आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. यापुढेही तो कायम ठेवा. त्याला मी तडा जाऊ देणार नाही, असे आमदार शिंदे म्हणाले.
बावी गावात बोलताना आमदार शिंदे म्हणाले, कोरडवाहू प्रकल्पात बावी गावाची निवड झाली होती. पण 10 वर्षे गावाला कुठलेच अनुदान मिळालं नव्हतं, पण मी कृषि राज्यमंत्री झाल्यानंतर त्यात लक्ष घातलं आणि बावी गावाला 3 कोटींच्या विविध साहित्यांचे अनुदान वाटप केलं. सिध्दनाथ मंदिराच्या पाठीमागून जो रस्ता हळगावला जातो तो देखील भविष्यात डांबरीकरणाचा झालेला असेल, असा शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला. तत्पुर्वी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते बावी येथील सिध्दनाथ महाराज मंदिर येथे आरती संपन्न झाली.
खांडवीत बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, विधानपरिषदेचा आमदार झाल्यापासून मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करतोय. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. खांडवीचा विकास करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. असे शिंदे म्हणाले.
रत्नापुर येथे बोलताना शिंदे म्हणाले की, रत्नापुरमध्ये एकखट्या तीन बंधारे दिले. संपुर्ण गाव बागायती करण्याचं जे पुण्य मला लाभलं ते निश्चित स्वरूपामध्ये माझ्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. जिथं काही होत नव्हतं, तिथे जर ऊस पिकत असेल तर खऱ्या अर्थानं मी माझ्या बापाच्या पोटी जन्म घेतला आणि ते सिध्द करून दाखवलं. मी राजकारणात आल्यावर लोकांना मदतीचा हात देऊ शकलो. ज्या शेतकऱ्यांची जमीन जिरायती होती, त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं हेच खऱ्या अर्थानं मोठं यश आहे, असे यावेळी शिंदे म्हणाले.
गेल्या तीन वर्षांपुर्वी मतदारसंघातील परिस्थिती बदलली होती. पण आता कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आलयं की, आपला गडी त्यो आपलाच असतो. लय बाहेरचा गडी कामाला ठेवून त्यो कधी गबाळ घेऊन जाईल याचा भरवसा नाही. रातच्याला त्याच्या ध्यानात आलं की आता इथं काही मजा नाही त्यो गडी कव्हा पळून जाईल सांगता येत नाही. गावातला गडी निघून गेल्यावर त्याला समजावून सांगता येतं पण युपी-बिहारचा गडी रातच्याला निघून गेल्यावर कुठून आणायचा? अशी परिस्थितीय. त्यामुळं आपला गडी कामाचाय, चांगलाय, कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून खाली उतरवलं नाही, असे म्हणत जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत अशी माणसं दुसर्यांसाठी काय करणार असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.
हळगाव, बावी, खांडवी, रत्नापुर, पाटोदा, डोणगाव येथील स्थानिक भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहात आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी तालुका भाजपचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————-
सगळ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्यात. तुम्ही माझ्याकडे लावा.
——————————————-
सुदैवाने आपल्याला चांगले दिवस आहेत. कोणाला संधी मिळाली नाही पण ती मला मिळाली. पक्ष देईल ती जबाबदारी वेगवेगळ्या राज्यात जाऊन पार पाडतोय. त्यामुळे समजून घ्या काय चाललयं ते. अशी जागा धरायची कोणी उठं म्हटलं नाही पाहिजे. अशी जागा तयार करायची लोकं म्हणली पाहिजेत ह्या जागेवर ह्योच जाऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण केलीय. महाराष्ट्रात काही व्हायचं म्हणलं की आपलं नाव टिव्हीवर आधी येतं. 2024 वर्ष सुरू होत आहे. सगळ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्यात. तुम्ही माझ्याकडे लावा. नक्कीच काहीतरी आणून दाखवतो तुम्हाला, असे सुचक वक्तव्य आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेड दौर्यात बोलताना केले.