राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे स्वागताध्यक्ष प्रा मधुकर राळेभात यांचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे वैभव राज्य पातळीवरील पोहोचावे व या भागातील साहित्यिकांना प्रोत्साहन व संधी मिळावी या हेतूने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठी साहित्य प्रतिष्ठान, जामखेडच्या वतीने गुरुवार दि.६ फेब्रुवारी रोजी जामखेड येथे
राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कवीवर्य आ.य.पवार यांच्या संकल्पनेतून होत असलेले हे साहित्य संमेलन जेष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी विजयकुमार मिठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी दिली.
या संमेलना बाबत माहिती देताना राळेभात म्हणाले की, दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १०: ०० वाजता महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. राम शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रथम सत्रात डॉ. फु. ला. बागुल यांचे अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत होणार आहे, तर तिसऱ्या सत्रात शंकर वाडेवाले यांचे अध्यक्षतेखाली काव्य संमेलन पार पडणार आहे.
संमेलनात छत्रपती राजे संभाजी साहित्य पुरस्कार व यावर्षीपासून दिला जाणारा कवीवर्य आ. य. पवार सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार यांचे वितरण विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थी व तरुण वाचकांपर्यंत साहित्य नेण्याचे कार्य साहित्य संमेलनामधून होत असते. त्यामुळे मोठ्या संख्येने रसिक श्रोते, साहित्य प्रेमी, लेखक-कवी पत्रकार यांनी संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215