जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून लोकांना बिबट्याचे दर्शन होत आहे. सोमवार दि.०९/१२/२०२४ रोजी रात्री भुतवडा तलावाजवळ एका गाईचे बिबट्याने भक्षण केल्याची घटना घडली आहे. शेतकरयांना शेतीपिकाला रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी जावे लागते मात्र या घटनेमुळे शेतकरयांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे शेतीसाठी रात्रीची वीज न देता दिवसा विज पुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार व विज वितरण आधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की जामखेड तालुका हा ज्वारी या पिकासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ज्वारी पीक हे सर्वत्र आहे. शेतकऱ्यांना ज्वारी पीकाला पाणी सोडण्यासाठी रात्रीचे जावे लागते. त्यामुळे जामखेड तालुक्यातील वाड्या-वस्त्यावरील गाव व परिसरातील वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करून दिवसा विद्युत पुरवठा करावा जेणे करून शेतकऱ्यांच्या जीवाची हानी होणार नाही. याची काळजी घ्यावी.
अगोदरच हमी भाव नसल्याने शेतक-यांच्या कष्टांचा खेळ होत आहे .निदान त्यांच्या जीवांचा खेळ होवू नये याची दखल प्रशासनाने घ्यावी, व तातडीने संबंधित वनविभाग व इतर संबधित विभागांना पाचारण करून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा. अश्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी जामखेड तहसीलदार यांना निवेदन देउन मागणी केली.