जामखेडला डिझेल अभावी बस सेवा बंद ; प्रवाशांचे होताहेत प्रचंड हाल!
जामखेड प्रतिनिधी
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असं ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी महामंडळाचा मोठा गलथान कारभार पाहायला मिळत आहे. जामखेड आगारात डिझेल नसल्याने एसटी बसेस उभ्या ठेवण्याची नामुष्की जामखेड बसस्थानक प्रशासनावर आली आहे. यामुळे शालेय विद्यार्थी व प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या शालेय विद्यार्थ्यांचा परिक्षेचा कालावधी आहे.डिझेल नाही म्हणून बस थांबल्या कूठ काय तांत्रिक अडचणी आहेत त्वरित तपासा लवकर एसटी चालू करा. एसटी वेळेवर सोडाव्यात असे भाजपा युवा मोर्चाचे तालूका उपाध्यक्ष मोहन मामा गडदे यांनी आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन सांगितले.
तीन सलग सूट्टी असल्याने डिझेल टँकर भरले गेले नाहीत आज दि २० रोजी दूपारी ४ वाजेपर्यंत डिझेल टँकर जामखेडला येईल. तो खाली झाल्यानंतर एसटी बसेसमध्ये डिझेल टाकले जाईल आणि त्यानंतर बस सेवा सुरू होईल. असे आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत प्रवाशांना जामखेड बसस्थानकावर ताटकळत थांबून राहावे लागणार आहे.
डिझेलची अगोदरच व्यवस्था करण्याची गरज असताना कोणत्या पातळीवर दूर्लक्ष होत आहे तो शोध घेणे आवश्यक आहे.राज्यशासन प्रवाशांच्या सेवेसाठी नवनवीन योजना आणत आहे. वयोवृद्ध नागरिकांना, महिलांना एसटी बसमध्ये प्रवासाची सवलत देण्यात आली अहे. असं असताना डिझेल अभावी बससेवा बंद राहत असून प्रवाशांची गैरसोय होणार असेल तर राज्य सरकारच्या या प्रयत्नाचे काहीही होणार नाही. यावर राज्य शासनाविषयी प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट आल्याशिवाय राहणार नाही.