जामखेड – यासीन शेख
मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि लोकशाही प्रक्रियेचे रक्षण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते.निवडणुकीच्या या हंगामात मतदारांना आकृष्ट करण्याकरिता वेगवेगळी प्रलोभणे उमेदवारांकडून दाखविली जातात. महिलांना मतदानाची भुरळ घालण्यासाठी साड्यांचे, विविध वस्तूंचे वाटप केले गेले.नागरिकांना वेगवेगळ्या सहली, देवदर्शनं अनेक विविध प्रकारचे प्रलोभन प्रयोग करून झाले. आता काही लोकांनी मतांची ठराविक किंमत निश्चित केली आहे. यातून आता निवडणुका म्हणजे मतदानाचा पवित्र्य हक्क हे फक्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगण्या पुरते राहीले आहे. याच्या पुढे जावून घरात माणसे किती आणि त्यांच्याकरिता किती नोटा असेच व्यवहार झपाट्याने होत असतात.
असे जर मतांचे मूल्य ठरवून लोकप्रतिनिधी निवडूण येऊ लागले तर सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असे समीकरण होईल, त्याकरिता प्रत्येकाने अशा आमिषापासून दूर राहून योग्य व्यक्तिस मतदान करावे.
लोकशाहीने दिलेला अत्यंत अमूल्य (अत्यंत किमती) आणि पवित्र हक्क आहे याचे भान प्रत्येक मतदात्यांनी ठेवावे. सत्ताकाळात हे लोकप्रतिनिधी कोणती कामे करतात त्यांच्याकडून काय अपेक्षित होते याचे उत्तर मतदारांनी त्यांच्याकडून या निवडणुकीत घ्यायला हवे. त्यामुळे नागरिकांनी आता जागे होऊन अशी प्रलोभने नाकारायला हवीत. तसेच ज्या कामासाठी या प्रतिनिधींना निवडूण दिले आहेत ती कामे त्यांच्याक़डून करून घ्यायला हवीत.
अलिकडे दुर्दैवाने निवडणूक लढविणे ही केवळ धन दांडग्यांचीच मक्तेदारी होऊ पाहते की काय असेच निवडणुकीतील धनाचा वाढता प्रभाव पाहून खेदाने म्हणावेसे वाटते. खरे तर सुजाण, सुबुद्ध मतदारांनी धनदांडगे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना खड्यासारखे वेचून बाजूला ठेवायला हवे. आपली सदविवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या बहुमूल्य मताचे दान सत्पात्रीच व्हावे याची प्रत्येक सुजाण मतदाराने काळजी घ्यायला हवी! विधानसभा निवडणुकीत आपला प्रतिनिधी म्हणून निवडताना मतदारांनी उमेदवाराची चारित्र्यसंपन्नता, सचोटी, प्रामाणिकपणा, त्याची लोकाभिमुखता, त्याचे ज्ञानीपण, त्याची ज्ञानलालसा, अभ्यासू वृत्ती, जनसामान्यांविषयी कळकळ, तळमळ पाहूनच निष्पक्षवृत्ती असणारा उमेदवारच निवडायला हवा! मतदारांनी प्रलोभनांना बळी न पडता नीरक्षीर न्यायाची विवेकबुद्धी जागृत ठेवून देशाच्या व राज्याच्या सुखकारक, कल्याणकारक भविष्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सामील होऊन आपल्या पवित्र मताचे सत्पात्री दान करून लोकशाही उत्सवाचा आनंद स्वाभिमानाने व निर्भयपणे साजरा करायला हवा.हा बाणेदारपणा जोपर्यंत सर्वत्र दिसत नाही तोपर्यंत चांगले प्रतिनिधी निवडूण येणार नाहीत. तसेच लोकशाही भक्कम होणार नाही
– – चौकट—-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत असताना पोलिसांना सतत कोटींवर रुपये सापडत आहेत. विशेष म्हणजे हे पैसे अनेक राजकीय पक्षांच्या संबंधित लोकांकडे सापडत आहेत. पोलिस संबंधितावर कारवाई तर करतच आहेत मात्र त्याची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे येतांना दिसत नाही . विरोधक आणि सत्ताधारी ते पैसे त्यांचे आहेत म्हणत एकमेकांवर आरोप करत असून केवळ फार्स म्हणून काही रक्कम पकडली तर उर्वरित त्यांनी तसेच गाडीतून जाऊ दिल्याचेही आरोप पोलिसांवर करतांना दिसत आहेत.