जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लोकशाही
घडवणाऱ्या मतदात्यांना जास्तीत जास्त मतदान करून विविध बक्षीसं मिळविण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांचे आवाहनाचे पत्र जामखेड नगरपरिषद कर्मचारी नागरिकांना घरोघरी, दूकान दूकान, चौकाचौकात जाऊन सांगतांना दिसत आहेत.
अहमदनगर मिशन ७५ या पत्रामध्ये म्हटले आहे की
मी तुमचा जिल्हाधिकारी म्हणून तुमच्याशी संवाद साधताना स्वातंत्र्याची पूर्ण झालेली ७५ वर्षाचा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर आहे आणि म्हणून भारताच्या सक्षम लोकशाहीसाठी “मिशन-७५” उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात राबवण्याचा मानस आहे. २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किमान ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करून जिल्हा राज्यात व देशात अग्रेसर बनवायचा आहे. याकरिता आपल्या सगळ्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करून योगदान देणे अपेक्षित आहे.
७५ % पेक्षा अधिक मतदान करणाऱ्या गावांचा “लोकशाहीचे शिलेदार” हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
उद्योजकीय क्षेत्रामधील कंपन्यांच्या १००% मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांना “सुपर वोटर अवॉर्ड” दिला जाणार आहे.
युवा नवमतदारांच्या १००% मतदानासाठी महाविद्यालयांना “युवाभारती” पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हाऊसिंग सोसायटयांना १००% मतदानासाठी “लोकशाहीचे शिल्पकार” हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. मला माहित आहे की १३ मे २०२४ रोजी कदाचित प्रचंड ऊन असू शकते म्हणून मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्हाला तुमच्या उज्ज्वल उद्यासाठी उन्हाला, अडचनींना न जुमानता मतदानाला बाहेर पडायचं आहे.
जगातली समृद्ध भारतीय लोकशाही आणि मी.. आम्ही दोघं मिळून १३ मे २०२४ रोजी मतदान केंद्रावर तुमची वाट पाहत आहोत.. आपण सारे मिळून अहमदनगर जिल्हा मिशन- ७५ साध्य करू या…. मतदान करू या. असे आवाहन अहमदनगर जिल्हाधिकारी
सिध्दाराम सालीमठ यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215