जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कारण छोटे असो की मोठे. इतकी मारहाण केली जाते की जीव घेण्याचाच प्रयत्न होताना दिसत आहे. पोलिस कारवाईतही राजकीय हस्तक्षेप होतांना दिसत आहे.या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांची सामान्य माणसांमध्ये दहशत निर्माण होत आहे.
उजेफ रफीक शेख रा. सदाफुले वस्ती जामखेड यांनी फिर्यादीत म्हटले आहे की दि. २६ मे रोजी रात्री ११ वा जामखेड शहरातील स्वराज कलाकेंद्रावर गेलो असता तेथे ओळखीचे असलेले विक्रम डाडर व सोनु वाघमारे यांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. दगड फेकून मारला व लोखंडी रॉडने मानेवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले. या गंभीर घटनेचा पोलिसांनी गून्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशलमिडीयावर आल्यावर सहा दिवसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेमुळे जामखेड मधील कलाकेंद्र पुन्हा चर्चेत आले आहेत.
.जामखेड व मोहा हद्दीत असलेले कलाकेंद्रात सातत्याने मारहाणीच्या घटना घडत असून कलाकेंद्र रात्रभर चालूच राहतात. जामखेड तालुका चार जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने राज्यभरातील गुंड कलाकेंद्रावर येत असतात.
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. परंतु पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करतात यामुळे जामखेड तालुक्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे अशी नागरिकांमधून चर्चा आहे.