जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील चौंडी येथील देवकरवाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वृद्ध महीलेच्या घराला आग लागल्याने संपुर्ण घर जळून खाक झाले. यावेळी घरातील असलेल्या गॅस टाकीचा देखील स्फोट झाला. मात्र या घटनेत जीवित हानी झाली नाही. घरातील सर्व सामान जळुन खाक झाल्याने सदर वृद्ध आणि निराधार महीलेला गावातीलच तरुणांनी आर्थिक मदत गोळा करून एक माणुसकीचे नात जपले.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील चौंडी येथे देवकरवाडी रस्त्याच्या लगत जलसाबाई किसन समुद्र या निराधार असलेल्या वृध्द महिला रहात आहे. त्या निराधार असल्याने मजुरी करुन आपली उपजीविका भागवतात. तीन दिवसांपुर्वी म्हणजे दि २२ मार्च २०२४ रोजी सायं चार वाजण्याच्या सुमारास त्या घरात काम करत असताना त्यांना अचानक घरात धुर झालेला दिसला त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखून घराच्या बाहेर पडल्या. मात्र त्यांचे घर लाकडी छपराचे असल्याने काही क्षणातच घर जळून खाक झाले. यावेळी यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा देखील स्फोट झाला व गॅसची टाकी फुटून टाकीचे तुकडे परीसरात विखुरले होते.
या आगीत घरातील धान्य, ज्वारी, पैसे व कपडे यासह इतर वस्तू जळून खाक झाल्या, स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज साऱ्या गावभर ऐकू गेला, त्यामुळे गाव भर एकच चर्चा सुरू झाली जेंव्हा गावकऱ्यांना ही घटना समजली तेंव्हा घटनास्थळाकडे धाव घेतली.
हातावर पोट भरणाऱ्या वृध्द महीला या रडून रडून पुरत्या गहाळ झाल्या, ज्यावेळी काबाड कष्ट करून पै-पै जमवलेली काही रक्कम व धान्य एका क्षणात जळुन खाक झाले. होत्याचं नव्हत झालं ते पाहून गावातील काही तरुण हवालदिल झाले. यावेळी गावातील काही तरुणांनी आर्थिक मदत गोळा करुन सदरची रक्कम वृध्द महीलेला दिले.
त्यावेळी विजय भांडवलकर अध्यक्ष शेतकरी संघटना, चोंडी, संकेत देवकर, तसेच शरद शिंदे यांनी घरी जाऊन मदत दिली त्यावेळी त्यांनी धान्य व इतर काही गरज सुध्दा लागली तर सांगा असे मदतीचे आश्वासन दिले