राष्ट्रवादी काँग्रेसाचा नारा “सुरक्षित जामखेड विकसित जामखेड”
भाजपचे उमेदवार सावकारकी, ताबेमारी गुंडगिरी करणारे तर काँग्रेसचे उमेदवार भाजपची बी टिम – आ. रोहीत पवार यांचा घणाघात
महिलांनी राजकारणात स्वनिर्णित व्हावे- सुषमा अंधारे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने उभे केलेले नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीचे उमेदवार हे सावकारी करणारे, ताबेमारी, गुंडगिरी करणारे नऊ उमेदवार आहेत तर जामखेड तालुक्यातील काँग्रेस ही भाजपची बी टिम असून आमचे उमेदवार पाडण्यासाठी स्वतःला काँग्रेसचा नेता म्हणवणाऱ्याने एबी फॉर्म ठराविक लोकांना दिले. असा घणाघाती आरोप आ. रोहीत पवार यांनी नगरपरिषद निवडणुकीत आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत केला.
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी दि २३ रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी आयोजित जाहीर सभेत आ. रोहीत पवार यांनी भाजप व काँग्रेसवर सडकून टीका करताना बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे, खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुबानअली शेख, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. रोहीत पवार यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे पती यांच्यावर जामखेड पोलीसात सावकारीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार दाखल झाली आहे. तसेच भाजपला नगराध्यक्ष निवडणूकीत विजय मिळणार नाही अशी खात्री झाली. त्यामुळे त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आहे अशी टीका आ. रोहीत पवार यांनी केली.
यापुढे बोलताना आ. रोहीत पवार यांनी जामखेड शहरात पाणीपुरवठा व भुमिगत गटारचे कामे तीन वर्षापासून रखडली असून ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आली पण काम होईना. तसेच श्री नागेश्वर मंदिर समोर जो लोखंडी पुल केला तो एका पावसात झाड पडले म्हणून तुटला असे निकृष्ट काम केले आहे. तो पुल बांधण्याचे काम म्हणजे मर्जीतील ठेकेदाराला फायदा होण्यासाठी केला.
अशी अवस्था भाजपवाल्यांनी केली आहे. जामखेड नगरपरिषदेसमोर आपल्या गोरगरिबांना रोजगार मिळावा म्हणून आपण अद्यावत ११६ गाळ्याचे कॉम्प्लेक्स बांधण्यात आले. पण भाजपवाल्यांनी वेगळेच नियोजन केले आहे. प्रत्येक नगरसेवकाला पाच गाळे व गाळ्याची किंमत 30 लाख असे दिड कोटी खाण्यासाठी. एक उमेदवार तर मटक्यावाला, ताबेमारी व गुंडगिरी करणारे आहे. पण आपण यांना पुरुन उरलो आहे. आमचे व्हिजन एकच आहे, सुरक्षित जामखेड विकासीत जामखेड असा आहे. त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन आ. रोहीत पवार यांनी केले आहे.
यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की महिलांना राजकारणात ५०% आरक्षण दिले आहे. महिलांमध्ये सक्षमपणे कारभार चालवण्याची क्षमता आहे. फक्त महिलांनी राजकारण समाजकारण करतांना पुरक माहिती घेऊन स्वनिर्णित व्हावे. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या शहाजी राळेभात व नगरसेवक सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे सुज्ञ सुशिक्षीत आहेत. यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी केले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 
